जीवन गौरव लेख

विषय :- विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास

*जि प शाळेच्या विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय झेप* 


 शरीर मन व बुद्धिचा विकास करते ते खरे शिक्षण होय . आजकाल सर्वच शाळांमधून विद्यार्थ्यांच्या  बौद्धिक विकासावर अधिक भर दिला जातो . विशेष म्हणजे पालकांनाही यात काही वावगे वाटत नाही. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाकडे  त्यातुलनेत खूपच कमी लक्ष दिले जाते .परंतु प्रत्येक वर्गात असे काही विद्यार्थी असतात ज्यांचा कल पुस्तकी शिक्षणापेक्षा त्यांच्या आवडीच्या कलाकुसरीच्या  क्रीड़ाप्रकाराच्या गोष्टीकडे जास्त असतो . त्यांच्या या आवडीला जर कुटुंबाचा व शिक्षकांचा पाठिंबा मिळाला तर ते विद्यार्थी चमत्कार करु शकतात . आज डहाणू मधील अशाच दोन विद्यार्थ्यांचा आपण परिचय करून घेणार आहोत ज्यांनी आपल्या मेहनतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर धड़क मारली आहे .
           स्लिंगशॉट हे नाव आपण ऐकलेच असेल .स्लिंगशॉट म्हणजे गलोल च्या सहाय्याने नेमबाजी करणे . पालघर जिल्ह्यात बहुतांश मुलांना गलोलची भारी आवड़. अनेक मुले गलोल चालविण्यात अतिशय पारंगत आहेत . अजय सखाराम पागी हा  डहाणू मधील जि प शाळा शिसणे चा विद्यार्थी . इतर विद्यार्थ्यांप्रमानेच अजयला ही गलोल मधे अतिशय पारंगत त्याचे हे कौशल्य शिक्षकांनी हेरले.राज्यस्तरीय स्लिंगशॉट स्पर्धेत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अजय सहभागी झाला . यात पंधरा मीटर अंतरावर टारगेट बोर्ड ठेवलेला असतो स्पर्धकास गलोल व गोटीच्या मदतीने अचूक नेम साधयाचा असतो. अजय ने सर्वस्व पणाला लावत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला . त्याची निवड कर्नाटक बेलगांव येथे होणाऱ्या  राष्ट्रिय स्पर्धेसाठी झाली . या स्पर्धेसाठी देशभरातून स्पर्धक आले होते . मात्र राष्ट्रीय स्पर्धेत सुद्धा अजय ने आपले कौशल्य पनास लावत बाजी मारली .त्याची आंतरराष्ट्रीय स्लिंगशॉटस्पर्धेसाठी त्याची निवड झाली. आता तो इटली यूरोप मधे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेची तयारी करत आहे . अजयच्या या यशात त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे . 

      दूसरा विक्रमवीर आहे करण जगन खानलोडा . माझा सहावीचा विद्यार्थी .आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मी मुलांचा पायाच्या बोटांवर उभे राहण्याचा सराव घेत असताना असे लक्षात आले की करण हा पंधरा मिनिटांपेक्षा ही जास्त वेळ बोटांवर ती उभा राहात आहे. इतर विद्यार्थ्यांपेक्षा तो खूप जास्त वेळ हे योगासन करत होता .करणचा हा वेगळेपणा ओळखून त्याला अधिक सराव करण्याचा सल्ला दिला व त्यास योग्य मार्गदर्शन केलेे .तू जर प्रामाणिकपणे सराव केला तर नक्कीच काहीतरी विक्रम नोंदवशिल असा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण केला .त्यानुसार करन ने सलग दोन तीन महिने घरी सराव केला. सरावानंतर त्याच्या पायाच्या बोटांवर उभे राहण्याच्या कृतीचा व्हिडिओ बनवताना करण तब्बल तेहेतीस मिनटे एकवीस सेकंद पायाच्या बोटांवर उभा राहिला .त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ चिल्ड्रन्स रेकॉर्ड बुक या ठिकाणी रेकॉर्ड नोंदवण्यासाठी पाठवण्यात आला. रेकॉर्ड प्रोसेसिंग टीमकडून पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मला  मेल प्राप्त झाला की  करणच्या जास्ती जास्त वेळ पायाच्या बोटांवर उभे राहण्याच्या विक्रमाची चिल्ड्रन्स रेकॉर्ड बुकमध्ये नोंद करण्यात आली. जि प शाळा गोवने येथे  सहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या   करण जगन खानलोडा या विद्यार्थ्याने चिल्ड्रन्स रेकॉर्ड बुक मधे *लोंगेस्ट टाइम स्टॅंडिंग ऑन टोज्*  या विक्रमाची नोंद केली  .ही संस्था जगभरातील लहान मुलांच्या विक्रमांची नोंद करत असते. आजपर्यंत युरोप अमेरिका सारख्या खंडातील अनेक कर्तृत्ववान मुलांनी या संस्थेत वेगवेगळे विक्रम रचले आहेत .
           प्रत्येक विद्यार्थ्यामधे एक सुप्त कौशल्य लपलेले असते . गरज आहे ती पुस्तकी चौकटीतून बाहेर येवून ते कौशल्य ओळखण्याची व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनासह उचित उद्धिष्टांपर्यन्त नेण्याची .


विजय  बाळासाहेब पावबाके
जि प शाळा गोवणे 
ता डहाणू जि पालघर 401103
९७३०३३२५८०

Comments

Popular posts from this blog

माझा नवोपक्रम

शाळा डिजिटल करतांना

वृक्षारोपण एक पुण्यकर्म