शाळा डिजिटल करतांना

*डिजिटल शाळा करताना*
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर डिजिटल शाळा हा शिक्षण क्षेत्रांत नवीन प्रयोग आपणास प्रकर्षाने ऐकायला, बघायला  व अनुभवायला मिळाला." डिजिटल शाळा" हि एक चळवळच स्वयंप्रेरणेने महाराष्ट्रावर शिक्षकांनी सुरू केली  आणि त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व शिक्षक  डिजिटल शाळा करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्नशील होते आणि त्यात यश प्राप्त करत होते .
         माझ्या मनातहि आपण डिजिटल शाळा करावी अशी सुप्त इच्छा या चळवळीमुळे निर्माण झाली होती .परंतु सर्वात मोठा प्रश्न होता कसे ?  आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवने तालुका डहाणू जिल्हा पालघर ही संपूर्ण ग्रामीण भागात व आदिवासी क्षेत्रातील शाळा असून शाळेमध्ये पहिली ते सातवी एकूण चारशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.शाळेत एकूण सात वर्ग खोल्या उपलब्ध आहेत  त्यामुळे संपूर्ण सात वर्ग डिजिटल करणे व त्यासाठी निधी संकलन करणे हि एक नक्कीच मोठी बाब होती आणि गावातील मोलमजुरी शेती करणाऱ्या पालकांकडून एवढा मोठा निधी जमा करणे कितपत योग्य आहे ?असा प्रश्न माझ्या मनाला पडत होता.  त्यामुळे वेगळ्या काही मार्गांचा विचार करता येईल का या संबंधी  माझा शोध सुरू होता .या कामी माझे पक्के मित्र झालेहोते मोबाईल आणि इंटरनेट  .सर्वप्रथम मी संगमनेरचे उद्योगपती डॉ. संजय मालपाणी यांना माझा डिजिटल शाळेचा विचार मेल ने पाठवला व त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली . त्यांनी मला याकामी रोटरी क्लबची  मदत घेण्याचा  बहुमोल सल्ला दिला आणि त्यानुसार स्थानिक रोटरी क्लबचा शोध घ्यायला सुरुवात केली .परंतु शोध घेत असताना एक बाब अशी लक्षात आलि कि आपणास डिजिटल शाळेसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या सर्व वस्तूंचे एक कोटेशन व अंदाजपत्रक आपल्याकडे असणे आवश्यक आहे .कारण कुठेही प्रस्ताव सादर करण्यासाठी या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत. म्हणून मी सर्वप्रथम डिजिटल शाळेसाठी ज्याच्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची यादी केलि. त्यामध्ये संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही ,इ लर्निंग अभ्यासक्रम  व अन्य बाबी यांचा समावेश होता . या सर्व गोष्टींचे कोटेशन ऑनलाइन मिळविण्याची मी ठरवले आणि इंडिया मार्ट वर या सर्व बाबींची रिक्वायरमेंट मि टाकलि. इंडिया मार्ट कडून या गोष्टी पुरवणाऱ्या सप्लायर्स व डीलर यांचे संपर्क मला मिळाले व थोड्याशा पाठपुराव्याने या सर्व गोष्टींचे कोटेशन ऑनलाइन मला मिळाले.आता माझी पुढची पायरी होती ती म्हणजे  डिजिटल शाळेसाठी  प्रस्ताव तयार करणे. आणि त्यानुसार मी प्रस्तावाचे काम सुरू केले.अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करण्याची माझी पहिलीच वेळ होती.माझ्याकडे लॅपटॉप नसल्याने मी मोबाइलवरच एमएस वर्ड अॅप्लिकेशन डाउनलोड केले.  मायक्रोसॉफ्ट वर्ड च्या मदतीने शाळेचे वर्ग आणि शाळेसाठी आवश्यक असलेल्या डिजिटल बाबींची फोटो अँड करून मला  शक्य होईल तेवढा इफेक्टिव प्रस्ताव तयार करण्याचा प्रयत्न केला. प्रस्तावाची एक सॉफ्ट कॉपी तयार झाली होती.आता प्रश्न होता की प्रस्ताव कुठे पाठवायचा आणि कसा पाठवायचा? परंतु याचाही मार्ग मला गुगलवरच सापडला. मुंबईमध्ये जेवढे एनजीओ, फाउंडेशन व रोटरी क्लब आहेत त्या सर्वांचे ई मेल्स कॉन्टॅक्ट नंबर मी वहीमध्ये नोंदवून घेतले. या सर्व बाबी करण्यासाठी शालेय वेळ देणे मला योग्य वाटत नव्हते म्हणून मी रोज पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत डिजिटल शाळेसाठी प्रस्ताव तयार करण्याचे व डोनर शोधण्याचे काम सुरू ठेवले .अशा पद्धतीने मुंबई  परिसरातील जवळजवळ शंभरहुन अधिक रोटरी क्लब ,NGO, यांचे ईमेल आयडी व क्रमांक मी माझ्याकडे जमा केले होते. एक दिवस मी बनवलेल्या अर्जाची सॉफ्ट कॉपी माझ्या ईमेल अकाउंटवरून त्या सर्व ईमेल्स ला सेंड केली. आता मी खूप आतुरतेने दात्यांच्या प्रतिसादा ची वाट पाहू लागलो. काही दिवस गेले आणि मला शंका वाटू लागली कि कोणिही प्रतिसाद देत नाही .आपण दाते शोधण्यासाठी जो मार्ग निवडला तो योग्य आहे की नाही ?अशी शंका मनामध्ये येत होती .परंतु; साधारण पाच दिवसांचा कालावधी गेला असेल आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे बे हयु   यांचा मेल मला मिळाला कि तुमच्या शाळेला वॉटर कुलर आणि प्युरिफायर आम्ही आमच्या क्लबच्या मदतीने पुरवत आहोत. मला खूप आनंद झाला. काही दिवसांमध्येच शाळेला १३० लिटरचा वॉटर कुलर आणि प्युरिफायर रोटरी क्लबच्या मदतीने उपलब्ध झाला. त्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या पाहुण्यांनी शाळेची गरज लक्षात घेऊन त्याच दिवशी शाळेला ई लर्निंग सेट पुरवण्याचे आश्वासन दिले आणि एका आठवड्यात शाळेस लर्निग सुविधा उपलब्ध झालि. अशाप्रकारे शाळेची एक वर्गखोली डिजिटल झाली होती मात्र अजूनही सहा वर्गखोल्या डिजिटल होणे बाकी होते .काही दिवसांनंतर वेदांत वेलफेअर फाउंडेशन चेंबूर येथील रवि सर यांचा मेल मिळाला कि तुमच्या शाळेला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करू . त्यांनी शाळेला तीन स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून दिले. अशा प्रकारे चार वर्ग खोल्या डिजिटल झाल्या होत्या. दरम्यानच्या काळात शासनाने पैसा कायद्याअंतर्गत ग्रामपंचायतींना डिजिटल शाळेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत असे मला समजले आणि तो शासन निर्णय मी उपलब्ध करून घेतला .  मी व सहकारी शिक्षकांनी ग्रामसभेमध्ये जाऊन उरलेल्या वर्गखोल्या डिजिटल करण्यासंबंधी विनंती केली आणि ग्रामसभेने देखील त्यासंदर्भात ठराव मंजूर करून काही दिवसांमध्ये शाळेला स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून दिले. अशा प्रकारे संपूर्ण शाळा डिजिटल झालि. मात्र डिजिटल अभ्यासक्रम हा एकाच वर्ग खोलीसाठी उपलब्ध होता.माननीय मुख्याध्यापिका मॅडम यांनी ही बाब लक्षात घेऊन शालेय अनुदानातून सर्व वर्गांसाठी पेनड्राईव्ह खरेदी केलि. आम्ही  इयत्तेनुसार वर्गानुसार अभ्यासक्रम त्यांमध्ये सेव केला. अशा प्रकारे आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवणे ही पूर्णपणे डिजिटल झाली.याचा मला मनस्वी आनंद आहे. ही सर्व प्रक्रिया होत असताना मला खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या .अनेक तांत्रिक बाबींचे ज्ञान मिळाले आणि वेगवेगळ्या लोकांशी माझा संपर्क आला जो आजहि टिकून आहे व त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मदत उपलब्ध होत आहे. संपूर्ण शाळा डिजिटल करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ,वेदांत वेलफेअर फाऊंडेशन व गोवने ग्रामपंचायत यांचे जे सहकार्य लाभले त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व आम्ही सर्व शिक्षक त्यांचे रु्णाईत आहोत  .


लेखन
विजय बाळासाहेब पावबाके
ता डहाणू जि पालघर


Comments

Popular posts from this blog

माझा नवोपक्रम

वृक्षारोपण एक पुण्यकर्म