*सुखी राहजोस्
*

पालघर जिल्ह्यात डहाणू तालुका हा भौगोलिक दृष्टया अतिशय संपन्न असा तालुका आहे. पश्चिमेला विस्तृत असा सागरी किनारा .पूर्वेला जव्हार च्या डोंगर रांगा.चहुबाजुंनी घनदाट वृक्ष असा निसर्ग सौंदर्याने नटलेला हा तालुका पर्यटकांना भुरळ घालत असतो .तालुक्याच्या पूर्वेला कोसेसरी नावाचे गांव हे सूर्या नादिवरील  धामनी धरण व कवडास बंधारा या दोन्ही प्रकल्पांच्या बरोबर मधे आहे. गावाच्या दक्षिनेला बारमाहि वाहनारी सूर्या नदी .नदिवर कोणत्याही प्रकारचा पुल नसल्याने मुख्य रस्त्यावर येण्यासाठी गावकरी व विद्यार्थी होडीचाच वापर करतात. पावसाळ्यात धरण भरले की नदीला मोठा पुर येतो .या पुरातून होड़ी नेणे म्हणजे जीवघेणा प्रवास .पण नाइलाजाने येथील आदिवासी बांधवांना हा प्रवास करावाच लागतो .
        मला या होडीचे खुप आकर्षण वाटते .होडीत बसून स्वतः च्या हाताने होड़ी वल्हवायला खुप मजा येते. पुराच्या पान्यातुन होड़ी एका तिरावरून दुसऱ्या तिरावर न्यायाची मजा काही औरच् .

   एके दिवशी मी माझ्या मित्रांसोबत सहज फिरायला कोसेसरी ला गेलो होतो.होडीतून पलिकडच्या किनार्यावर उतरलो. भात कापनीचे दिवस होते. आम्ही शेतातून चालत होतो. दोन्ही बाजूने गवत वाढल्याने वाटेवरून चालने अवघड जात होते .अधून मधून एखादा सर्पराज आम्हाला आडवा जावून आमचा थरकाप उडवत होता. कसेतरी वाट काढत आम्ही गावाच्या जवळ आलो. उन्हात चालून तहान ही लागली होती .जवळच्याच् दुकानात गेलो. पाणी पिले .नंतर ठंडा मागवला. खुर्चीत बसून आम्ही ते पितच होतो तेवढ्यात एका आजीने रिकामा ग्लास आमच्या समोर केला .मी आजीकडे पाहिले .चार फूट उंचीची ,अंगावर गूड़घ्यापर्यंत खुप् जुने लुगडे नेसलेली, हातात काठी, कमरेत वाकलेली ,डोक्याचे केस पांढऱ्या मिठाई सारखे ,सर्व दातांनी तोंडातून पळ काढलेला,  काताड़ी हाडाला चिकटलेली एक म्हातारी खुप् आशेने आमच्याकडे पाहत होती.  वयाचा तर अंदाजच करता येत नव्हता. पण म्हतारी शंभरीतली असावी असे वाटत होते.
 मी तिच्या त्या मूर्तीकडे पाहतच होतो आणि पाहता पाहताच तिने पुढे केलेल्या ग्लासमध्ये मी ठंडा टाकला. म्हातारी गालातल्या गालात हसली आणि पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसली. पण मला मात्र तिच्या विषयी कुतूहल वाटले .म्हणून ;मी उठलो  आणि तिच्या जवळ जाऊन बसलो. ती जराशी कावरीबावरी झाली .मी विचारलं, "आजी तुझे वय काय ?"म्हातारी म्हणाली," हा सगले सांग  शंभरावर पाच वरीस  झाल ."ते ऐकून मी थक्कच झालो. शंभरी पूर्ण केलेली आजी  शरीराने जरी  खंगली होती ;इतर अवयव जरी फितूर झाले असले तरी तिचे डोळे आणि कान मात्र अजुनही किल्ला लढवत होते . तिच्याविषयी अधिक जाणून घेण्याची माझी उत्सुकता वाढली होती .मी सहज गमतीने म्हणालो , "आजी ,अजून किती वरिस जगणार ?"तर ती हसून म्हणाली, "आरं !देव नेय नाही ना.. मंघा काय करू ? "तिचे उत्तर ऐकून काय बोलावे ते सुचेना .या वयातही तिचा चेहऱ्यावरचे हास्य आत्मविश्वास माझ्या मनाला सुखावत होता .लहान मुलाचं हसणं जेवढं मनाला सुखावतं ना  अगदी तेवढचं  .मी विचारलं ,"राहते कुठे ?"ती हात दाखवून  म्हणांली ," त्या तथं झोपडी आहं."    "सोबत कोण असते तुझ्या ?"माझे प्रश्न सुरूच होते  .  "कोणी हो  नायं. मी एकलीच .मला भीती हो नाय वाट. एकलीच फिरं ." हे एेकून मी अचंबित झालो .वयाची शंभरी पार केलेली म्हातारी जंगलांमध्ये झोपडीत एकटीच कशी राहू शकते ?याचं मला आश्चर्य वाटत होतं .इकडे  शहरी संस्कृतीत देह पोसलेली  मंडळी जरासे काही दुखायला लागले की दहा जण यांना सोबत लागतात  आणि  आयुष्यातले काही शेवटची क्षण जगणारी म्हातारी त्या जंगलांमध्ये एकटीच आनंदाने राहतेय. माझी उत्सुकता आणखी वाढली. मी विचारलं ,"मग खातीस काय? जेवन बनवते का?" ती म्हणाली," नाही ,मांगून खाय ."म्हणजे घरोघरी जिथे मिळेल तिथे उरलं सुरलं अन्न मागून ती तिच्या जीवाची गुजराण करत होती. तिच्या शेजारीच एक पातेले होते. मी ते उघडून बघितले .त्यात दाळ आणि भात होता .समोरच शाळेत मुलांची जेवणाची सुट्टी झालेली दिसत होती. म्हातारीने थोडासा दाळ भात घेतला असेल तिच्या साठी .मी म्हणालो," जेवण सम्पवले नाही का ?" तर ती म्हणाली ,"नाय थोडा आह .आथा सांचे खाल."   म्हणजे अर्धा भात दुपारी व उरलेला  रात्री  झोपताना खावून म्हातारी दिवस काढत होती  .एवढ्या कठीण परिस्थितीत राहत असताना सुद्धा तिच्या चेहऱ्या वरचा आनंद  मनाला गहिवरुन टाकणारा होता. तिचा स्वर दुखरा नव्हता .एवढ्या कठीण परिस्थितीतही कुणाविषयी त्रागा नाही. जे समोर आले त्याला ती आजी खुप् हसत हसत सामोरे जात होती . आपले उरले सुरले दिवस आनंदात घालवत होती. दिसेल त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत होती. आणि दिलखुलास हसतही होती  .मी बराच वेळ तिच्यासोबत गप्पा मारत होतो .का कोणास ठाउक ? एक वेगळीच ऊर्जा मला मिळत होती. शेवटी उशीर झाला आणि मी तिचा निरोप घेतला. दोन्ही हात वर करून ती म्हणाली," जा हो .सुखी राहजोस् ." तिच्याकडे देण्यासारखे काही नसतांनाहि लाख मोलाचा आशीर्वाद ती देवून गेली  .आम्ही उठलो. वाटेवर निघालो . पण पुन्हा एकदा मागे वळून तिच्याकडे बघतांना  चार फुटांची ;शरीराने कृश झालेली ती आजी  मला  वटवृक्षापेक्षाही विशाल वाटली. बऱ्याच वेळ तिची छबी नजरेसमोर तरळत होती ......



लेखक 
विजय बाळासाहेब पावबाके 
प्रा .शिक्षक 
९७३०३३२५८०

Comments

Popular posts from this blog

माझा नवोपक्रम

शाळा डिजिटल करतांना

वृक्षारोपण एक पुण्यकर्म